
बारामती : जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बारामती येथे जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्ह्याच्या वतीने राज्य युवक अध्यक्ष सुधीर नाईक व जिल्हाध्यक्ष पै. नानासाहेब मदने यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सादर केले.
२०१४ पासून जय मल्हार क्रांती संघटना ही भाजप व महायुतीच्या मित्र पक्षांसोबत घटक पक्ष म्हणून सातत्याने काम करत आहे. प्रत्येक निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी या संघटनेने रस्त्यावर उतरून, मेहनत घेऊन महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मात्र आजतागायत संघटनेच्या कोणत्याही प्रतिनिधीला किंवा रामोशी-बेरड समाजाला विधान भवनात एकही जागा मिळालेली नाही.
हे किती मोठे अन्यायाचे आहे ! बहुजन समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून लढा देणारे दौलत शितोळे यांना आजपर्यंत विधान परिषदेत संधी दिली गेली नाही. ज्या संघटनेने महायुतीला प्रत्येक निवडणुकीत साथ दिली, त्याच संघटनेच्या कार्यकर्त्यांना आणि रामोशी-बेरड समाजाला प्रतिनिधित्व का नाकारले जाते, असा प्रश्न आता संघटनेच्या कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहे.

शितोळे यांच्या माध्यमातून बहुजन समाजाचा खरा आवाज विधान परिषदेत पोहोचावा, यासाठी ही मागणी करण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष पै. नानासाहेब मदने, नगरसेवक किरण खोमणे, तालुकाध्यक्ष महेंद्र भंडलकर, विलास आडके, अजित शिरतोडे, तुकाराम चव्हाण, चांगदेव भंडलकर, संग्राम चव्हाण, रविंद्र जाधव, योगेश मदने, ऋषिकेश चव्हाण, उमेश चव्हाण, लोकेश खोमणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


