
● बारामती : प्रतिनिधी
संपूर्ण राज्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेल्या बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी-शिवसेना पुरस्कृत श्री. सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलने एकहाती वर्चस्व मिळविले. विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप, माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वातील लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या श्री. सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेलला या निवडणूकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
सोमेश्वर कारखाना निवडणूकीत अखेरच्या क्षणी नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीच्या पॅनेलमधील काही उमेदवारांच्या नावावर आक्षेप घेत पुरुषोत्तम जगताप यांनी बंडाचा झेंडा फडकावला. अवघ्या एका दिवसात त्यांनी पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुरंदरमधील शिलेदार सुदाम इंगळे, माणिक झेंडे यांना सोबत घेत वेगळी चूल मांडली. राष्ट्रवादीने त्यांच्या यादीत जगताप यांना उमेदवारी दिल्यानंतरही ती नाकारत त्यांनी स्वतंत्र पॅनेलची घोषणा केली. त्यामुळे बिनविरोधच्या टप्प्यावर असलेल्या सोमेश्वरच्या निवडणूकीने अचानक निर्णायक वळण घेतले. राष्ट्रवादी (शप)नेही जोर बांधला. परंतु त्यांच्या पॅनेलला ब वर्गासाठी उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे कारखान्याच्या २१ जागांसाठी तिन्ही पॅनेलच्या ६२ जणांसह एकूण ८३ उमेदवार रिंगणात राहिले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर तालुक्यातील मोठ्या संस्थेची ही पहिलीच निवडणूक होती. त्यात राष्ट्रवादी सुरुवातीला काहीशी गाफिल राहिली. परंतु जगताप यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीने जोरदार ताकद पणाला लावली. कारखान्याच्या प्रगतीत १९९२ पासून अजितदादांनी दिलेले योगदान, त्यांच्या निधनानंतरही भावनिक साद, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अखेरच्या टप्प्यात घेतलेली आक्रमक भूमिका, खा. पार्थ पवार यांनी केलेले प्रचाराचे नियोजन, युवा नेते जय पवार यांनी गावोगावी – वाड्यावस्त्यांवर जात केलेला प्रचार, पुरंदरमधून आमदार विजय शिवतारे यांची मिळालेली खमकी साथ या पॅनेलला विजयापर्यंत घेवून गेली.
रविवारी २७ हजार ७६७ मतदारांपैकी २३ हजार ३९३ म्हणजेच ८४.२५ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले होते.सोमवारी मतमोजणीला सुरुवात झाली. ब वर्गातून संग्राम तानाजी सोरटे यांच्या रुपाने राष्ट्रवादीने पहिला विजय मोठ्या फरकाने खेचून आणला. त्यानंतर निंबूत-खंडाळा गट क्र. १ मध्ये या पॅनेलचे तिन्ही उमेदवार ८ हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले. मुरुम-वाल्हा या गट क्र. २ मध्ये होम पिचवर विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांना स्वतःला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अन्य गटातही त्यांचा लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. सभासदांनी त्यांना मोठ्या फरकाने धूळ चारली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा श्री. सोमेश्वर विकास पॅनेल तिसऱ्या स्थानी राहिला. अपक्षांची अवस्था तर अत्यंत बिकट झाल्याचेच मतपेटीतून दिसून आले.


