
बारामती : श्री. संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग क्रमांक ९६५ अंतर्गत काटेवाडी (ता. बारामती) येथील गट क्रमांक ३१९ मधील भूसंपादन प्रकरणी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याने मोठी नाराजी पसरली आहे.
मागील तीन वर्षांपासून या शेतकऱ्यांनी बारामतीच्या उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा केला, तरी आजतागायत प्रशासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही. गट क्रमांक ३१९ मधील तब्बल १९ खातेदार शेतकऱ्यांना भूसंपादनाचा पूर्ण मोबदला मिळालेला नाही. अधिकृत कागदपत्रांमध्ये केवळ ८ आर क्षेत्र संपादित दाखवण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात ३० ते ४० गुंठे जमीन महामार्गासाठी वापरण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे ठाम मत आहे.
यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या हक्काचा मोबदला मिळालेला नाही आणि त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. मोजणी अपूर्ण आणि चुकीची झाल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला असून, तात्काळ फेरमोजणी करण्याची मागणी केली आहे.
मोबदला न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सदर ठिकाणचे काम बंद ठेवले आहे. त्यामुळे संपूर्ण महामार्गाचे काम अर्धवट अवस्थेत थांबले आहे. या प्रकरणात काही अधिकाऱ्यांनी मोबदल्याची रक्कम अन्यत्र वळविल्याचा देखील गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.
स्थानिक नागरिक अजित देवकाते यांनी या प्रकरणात राजकीय पातळीवरही पाठपुरावा सुरू केला असून, तातडीने योग्य मोबदला देण्याची मागणी केली आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या :
- गट क्रमांक ३१९ ची तात्काळ फेरमोजणी करावी
- प्रत्यक्ष संपादित क्षेत्रानुसार योग्य मोबदला द्यावा
- संपादित क्षेत्रधारकांची संमती घेऊनच पुढील कार्यवाही करावी
- प्रलंबित मोबदल्यामुळे थांबलेले महामार्गाचे काम तातडीने सुरू करावे
दरम्यान, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या पाहणीसाठी १० एप्रिल रोजी बारामती दौऱ्यावर येणार आहेत. त्यापूर्वीच शेतकऱ्यांना त्यांचा प्रलंबित मोबदला मिळावा, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी घेऊन महामार्गाचे काम करायचे आणि मोबदला मात्र तीन वर्षे रखडवायचा, हे किती मोठे अन्यायाचे आहे! प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि महामार्गाचे काम सुरळीतपणे पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


