
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर पोलीसांनी हनी ट्रॅपच्या माध्यमातून फसवणूक करून खंडणी उकळण्याचा गंभीर प्रकाराचा पर्दाफाश केला असून, या प्रकरणी आरोपी प्रशांत सरतापे व त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार यांनी दिली असून, त्यांना जाळ्यात ओढून मोठ्या रकमेची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. फिर्यादी यांचा परिचय बारामतीतील एका प्रशिक्षण केंद्रात गेस्ट लेक्चरर म्हणून येत असताना काही व्यक्तींशी झाला होता. त्यानंतर एका महिलेकडून वारंवार फोन व व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्यात येत होता.
सुरुवातीला मार्गदर्शनाच्या नावाखाली संवाद सुरू झाला; मात्र पुढे हा संपर्क जाणीवपूर्वक ओळख वाढवत जाळ्यात ओढण्यासाठी करण्यात येत असल्याचे उघड झाले. संशय आल्याने फिर्यादी यांनी संबंधित क्रमांक ब्लॉक केला असता, दुसऱ्या क्रमांकावरून पुन्हा संपर्क साधण्यात आला. यानंतर आरोपींकडून व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. तसेच खोटा बलात्कार व अॅट्रॉसिटी प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवत सुरुवातीला सुमारे ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. ही मागणी नंतर टप्प्याटप्प्याने कमी करत २५ लाख आणि त्यानंतर १० लाख रुपयांपर्यंत आणण्यात आल्याचे समोर आले आहे.
आरोपींकडून ५ एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान अनेक वेळा कॉल करून फिर्यादी यांच्यावर दबाव टाकण्यात आला. “पैसे दिले नाहीत तर बदनामी करू”, “खोटे गुन्हे दाखल करू” अशा स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्या. या सर्व संभाषणांचे फिर्यादी यांनी दुसऱ्या मोबाईलच्या साहाय्याने ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग केले असून, त्यामध्ये धमकीजन्य संवाद स्पष्टपणे आढळून आला आहे. दरम्यान, आरोपींकडून दबाव वाढवत तातडीने १ लाख रुपयांची रक्कम उकळण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे. ही रक्कम बारामती एमआयडीसी परिसरातील पेट्रोल पंपाजवळ मध्यस्थांच्या माध्यमातून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच फिर्यादी यांना प्रत्यक्ष भेटीस बोलावून वाहनात बसवून मोबाईल तपासणे, दमदाटी करणे व पुन्हा मोठ्या रकमेची मागणी करणे असे प्रकारही घडल्याचे तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणात हनी ट्रॅप, व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे ब्लॅकमेलिंग, खंडणी मागणी आणि कायद्याच्या भीतीचा गैरवापर समोर आले आहेत. पोलिसांनी फिर्यादीकडील सर्व डिजिटल पुरावे जप्त केले असून, त्यांची तांत्रिक तपासणी सुरू आहे. नागरिकांनी अपरिचित व्यक्तींशी सोशल मीडिया किंवा व्हिडिओ कॉलद्वारे वैयक्तिक संपर्क टाळावा. कोणतीही खाजगी माहिती, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू नयेत. अशा प्रकारचा हनी ट्रॅप किंवा ब्लॅकमेलिंगचा अनुभव आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.




