
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर पोलिसांनी मध्यरात्री गोकुळनगर, मळद (मळद–फलटण रोड) परिसरात छापा टाकत अवैध गोवंश कत्तलीचा प्रयत्न उधळून लावला. या कारवाईत १० गायी व ७ बैल अशी एकूण १७ जनावरे जप्त करून त्यांना सुरक्षिततेसाठी गोशाळेत हलविण्यात आले.पोलिसांची गाडी घटनास्थळी पोहोचताच कत्तल करणाऱ्यांचा मनोदय फसला आणि आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या प्रकरणी गुन्हा नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक काम करत आहे.
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गोवंश कत्तल व प्राण्यांवरील क्रूरतेबाबत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवित कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. शहर पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रात्रीच्या वेळी छापा टाकून ही कारवाई केली. जप्त केलेली सर्व जनावरे मळद येथील दयोदय गोशाळेत सुरक्षित ठेवण्यात आली असून त्यांना आवश्यक आहार, पाणी व वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहेत.
दरम्यान, आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून त्यांचा सखोल तपास केला जात आहे. संबंधितांचा पूर्व इतिहास तपासून पुढील कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध कृत्यांबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





