
समाजात सजगतेची गरज
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर व परिसरात वाढत्या प्रमाणात ड्रग्जच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अती प्रमाणात अमली पदार्थ सेवन केल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, यामुळे पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
मृत्यू झालेला तरुण हा बारामतीतील रहिवासी असून, काही काळापासून तो अमली पदार्थांच्या आहारी गेल्याची माहिती पुढे येत आहे. घटनादिवशी त्याने मोठ्या प्रमाणात ड्रग्जचे सेवन केल्याने त्याची प्रकृती अचानक बिघडली. तत्काळ त्याला उपचारासाठी येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डाॅक्टरांनी मात्र उगाच झेंगट मागे नको म्हणत उपचाराला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे बारामतीतील दुसऱया एका प्रा. लि. हाॅस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बारामतीत ड्रग्जची उपलब्धता वाढत असल्याचे सातत्याने बोलले जात आहे. अंमली पदार्थांसह नशेचा बाजार तेजीत आहे. बारामती शहर पोलिसांनी सुमारे अडीच कोटींहून अधिक रुपयांचा गांजा पकडला, पण पोलिसांना त्यातील आरोपी सापडत नाहीत, अशी परिस्थिती आहे. गेल्या दीड महिन्यात पोलिसांनी जप्त केलेला गांजा कोणाचा याचा उलगडा झालेला नाही. पोलिस मात्र तपास सुरु आहे, एवढेच गुळमुळीत उत्तर देत आहे.
अंमली पदार्थांचा व्यापार या भागात तेजीत सुरु आहे. विशेषतः तरुणांमध्ये याचे आकर्षण वाढत असून, काही टोळ्या गुपचूप या पदार्थांची विक्री करत असल्याचीही चर्चा आहे. पोलिसांकडून अधूनमधून कारवाई केली जात असली तरी ती जुजबी ठरत आहे.
स्थानिक नागरिक आणि पालकांनी प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. “तरुण पिढी वाचवायची असेल तर ड्रग्जविरोधी मोहीम अधिक तीव्र करणे गरजेचे आहे,” अशी भावना व्यक्त होत आहे. शाळा-कॉलेज स्तरावर जनजागृती करण्याचीही गरज अधोरेखित केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडे कोणतीही खबर अथवा तक्रार दिली गेली नाही. मयत तरुणाचा अंत्यसंस्कार उरकले गेले. त्यामुळे संबंधित ड्रग्ज पुरवठादारांचा शोध लागणे आता कठीण होवून बसले आहे. या घटनेनंतर तरी प्रशासन आणि समाज दोघांनीही जागे होऊन ठोस पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




