
बारामती : प्रतिनिधी
शासकीय कामात अडथळा आणत कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या खटल्यात नवनाथ तुकाराम बाळटकर (रा. लाोणारवाडी, ता. दौंड) याला येथील जिल्हा न्यायाधिश हितेंद्र वाणी यांनी दोषी ठरवत फिर्यादीला पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शिक्षा सुनावली.
दि. २१ जुलै २०२२ रोजी दुपारी २ वाजता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कुरकुंभ शाखेचे वायरमन मोहीमपाशा अब्दुल रशीद काझी हे लोणरवाडी येथे गावठाण लाईटचे कनेक्शन जोडण्यासाठी गेले होते. यावेळी नवनाथ बाळटकर यांनी त्यांच्या घरासमोर उभी असलेली मोटारसायकल काढण्याच्या कारणावरून वाद घालत संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण केली तसेच शिवीगाळ करून अपमानित केले.
या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास सहाय्यक फौजदार आर. बी. पवार यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात फिर्यादीसह एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तपासी अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता विकास घनवट यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने सर्व पुरावे व साक्षी विचारात घेत आरोपीला दोषी ठरवत फिर्यादीला पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला. तसेच २ वर्षे चांगल्या वर्तणूकीचा बाॅण्ड लिहून घेण्यात आला. या दोन वर्षाच्या काळात आरोपीने न्यायालयाची स्थलसिमा सोडून जायची नाही, नशा करायची नाही, नैतिकदृष्ट्या चुकीचे काम करायचे नाही, मारहाण करायची नाही. तसे केल्यास कायद्याप्रमाणे शिक्षा देण्याचा हक्क न्यायालयाने राखून ठेवला.
या खटल्यात पोलिस उपनिरीक्षक गोरख कसपटे, सहाय्यक फौजदार अभिमन्यू कवडे, हवालदार मनिषा अहिवळे यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.




