
जिल्हाध्यक्ष – तालुकाध्यक्षांची निष्क्रियताही कारणीभूत
● बारामती : प्रतिनिधी
पॅनेल टू पॅनेल मतदान करा, गमती जमती करू नका, असे प्रचाराच्या सांगता सभेत पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितले असतानाही राष्ट्रवादी-शिवसेना पुरस्कृत श्री. सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार पॅनलमधील काही उमेदवार आता अखेरच्या दिवशी एका फुलीवर आले आहेत. काहीही करून मला एक फुली द्या, बाकी माझे काही म्हणणे नाही, अशी विनवणी ते सभासदांना करू लागले आहेत. यातून राष्ट्रवादीच्या पॅनेलमधील बेबनाव उघड होत असून विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनेलला यातून फायदा होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सोमेश्वरच्या निवडणूकीसाठी तीन पॅनेल रिंगणात आहेत. राष्ट्रवादीच्या प्रचार सांगता सभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषीमंत्री दत्तात्रय भऱणे यांनी पॅनेल टू पॅनेल मतदान करा, असे आवाहन उपस्थितांना केले. ना. भरणे यांनी तर या निवडणूकीत गमती जमती करू नका, त्यासाठी इतर निवडणूका तुम्हाला आहेत. उगाच एखाद्याचे वजन वाढेल म्हणून त्याची पेटी कमी कशी भरेल असे प्रयत्न काही मंडळी करत असतात. असले राजकारण करू नका, असे स्पष्टपणे बजावले होते. परंतु त्याचा काहीही परिणाम राष्ट्रवादीच्या पॅनेलमधील उमेदवारांवर झालेला दिसून येत नाही. मतदानाच्या पूर्वसंध्येला शनिवारी काही उमेदवारांनी एका फुलीची गळ सभासदांना घालण्यास सुरुवात केली. उमेदवार व त्यांचे जवळचे लोक सभासदांकडे जात आमची एक फुली लक्षात ठेवा, बाकीच्यांचे आम्हाला काही देणेघेणे नाही, अशी भाषा वापरू लागले असल्याची चर्चा आहे. सहाजिकच यामुळे राष्ट्रवादीच्या पॅनेलसमोरील आव्हाने वाढण्याची चिन्हे आहेत.
बारामती तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. इथे विरोधकांनी असे प्रकार केले असते तर सभासद ते एकवेळ समजू शकले असते. परंतु राष्ट्रवादीच्याच काही उमेदवारांकडून अशा गोष्टी होवू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्यानंतर पक्षीय शिस्तीचा अभाव तालुक्यात दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्य़क्ष व तालुकाध्यक्ष सर्वसामान्यांना मोजायला तयार नाहीत. त्यांची ही निष्क्रियता आगामी काळात पक्षासाठी हानीकारक ठरेल अशी भिती व्यक्त होत आहे.
दुसरीकडे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या बंडामुळे सोमेश्वरच्या निवडणूकीत मोठी रंगत निर्माण झाली आहे. पुरंदरमधून त्यांना माजी आमदार संजय जगताप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सुदाम इंगळे, माणिक झेंडे यांनी साथ दिली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून युगेंद्र पवार यांनी पॅनेल तयार केला आहे. तरीही त्यांचेच पुरंदरचे काही पदाधिकारी पुरुषोत्तम जगताप यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे राजकीय त्रांगडे निर्माण झाले आहे. त्यात भरीस भर म्हणून आता राष्ट्रवादीचेच उमेदवार मला एक मत द्या, मला चुकवू नका, बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घ्या, असे म्हणू लागल्याने पॅनेलपुढील अडचणी वाढल्या आहेत.

