
उपमुख्यमंत्र्यांचे भावनिक कार्ड चालणार का ? सभासदांमध्ये उत्सुकता
● बारामती : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी तिन्ही पॅनेलच्या सांगता सभा शुक्रवारी पार पडल्या. त्यानंतर शुक्रवारी रात्री सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात हायहोल्टेज ड्रामा घडला. राष्ट्रवादी (अप) पक्षाचे माळेगावच्या नगराध्यक्षांना पैसे वाटप करताना पकडल्याचा दावा पुरुषोत्तम जगताप यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. दरम्यान शनिवारी माजी आमदार संजय जगताप यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीकडून माळेगाव कारखान्याच्या निवडणूकीप्रमाणे सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात बेफाम पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीला होम पिचवरच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून यामुळे त्यांच्या पॅनेलची भिस्त आता लक्ष्मी दर्शनावरच अवलंबून आहे.
शुक्रवारच्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अजितदादांच्या आठवणीने भावूक झाल्या. त्यामुळे सभेत भावनिक वातावरण निर्माण झाले. अजितदादांमुळेच सोमेश्वरचा विकास झाल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. दुसरीकडे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी त्यांच्या पॅनेलच्या सांगता सभेत राष्ट्रवादीने दिलेल्या काही उमेदवारांवर गंभीर आक्षेप नोंदवले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र यांनी कारखान्याचा चेअरमन आमच्या पाठींब्याशिवाय होवू शकत नाही असे सांगितले.
शुक्रवारी रात्री सभा संपल्यानंतर राष्ट्रवादीचे माळेगावचे नगराध्यक्ष सुयोग सातपुते, करण खलाटे यांचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये एक मोटार दिसत असून त्यातून पैसे वाटप केले जात असल्याचा तसेच मोटारीत २० लाख रुपयांची रोकड व मतदार यादी सापडल्याचा दावा पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनेलने केला. दरम्यान शनिवारी माजी आमदार संजय जगताप यांनी या विषयावरून राष्ट्रवादीला कोंडीत पकडले. होळ येथील आठ फाटा परिसरात मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केली.
माळेगाव येथील नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्यासह काही जणांकडून पैसे वाटप होत असल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचा दावा माजी आमदार संजय जगताप यांनी केला. संबंधित वाहनात २० लाख रुपये आणि काही पाकिटे असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, सुदाम इंगळे आदींच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय जगताप बोलत होते. या वेळी त्यांनी निवडणुकीतील कथित पैशांच्या व्यवहारावरून विरोधकांवर टीका केली. त्यामुळे राष्ट्रवादी काहीशी बॅकफूटवर गेल्याचे शनिवारी दिसून आले.
आता मतदानाला अवघे १२ तास उरले आहेत. राष्ट्रवादीकडून सभासदांना लक्ष्मीदर्शन घडवले जात आहे. या जोरावरच या पॅनेलचे भवितव्य आता अवलंबून आहे.

