
● बारामती : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी (दि. ११) मतदान पार पडत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा या निवडणूकीत मोठा कस लागणार आहे. विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी त्यांना कडवे आव्हान उभे केले आहे. अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीने आता साम, दाम, दंड, भेद नितीचा अवलंब सुरु केला आहे. बारामतीतील झाडून साऱया सहकारी संस्थांचे अधिकारी, कर्मचारी प्रचारात उतरवले आहेत. बारामतीच्या नगरसेवकांसह ठेकेदारांची मलिदा गॅंगही प्रचारात सक्रीय झाली आहे.
या निवडणूकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील श्री. सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार पॅनेलने सत्ता कायम राहावी यासाठी मोठा आटापिटा सुरु केला आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हा बॅंक, बारामती बॅंक, दूध संघ, खरेदी-विक्री संघ, बाजार समिती येथील संचालकांना तर कामाला लावलेच. परंतु त्याचबरोबर आता अधिकारी – नोकरदारांनाही प्रचाराला जुंपले आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ असो की सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ असो तेथील शिक्षक, प्राध्यापकांना सुद्धा मतांसाठी राष्ट्रवादी दारोदार फिरवत आहे.
बारामतीत ठेकेदारांची मलिदा गॅंग गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. ही मलिदा गॅंग सध्या सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात गावोगावी फिरते आहे. बारामती व माळेगावचे झाडून सारे नगरसेवक सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात फिरत आहेत. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे.
मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादीने पुरुषोत्तम जगताप यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांनी बंड करून दहा दिवस उलटल्यावर अखेरच्या क्षणी पक्षाला हा निर्णय का घ्यावा लागला याबाबतही उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे.
सत्तेतील राष्ट्रवादीने या निवडणूकीत कोणतीही कसर ठेवलेली नाही. सभासदांना खुश कऱण्याचे सर्व प्रयत्न सुरु ठेवले आहेत. त्यासाठी अगदी प्रशासनाची सुद्धा मदत घेतली जात आहे. सभासद-शेतकऱयांकडे हे अधिकारी-कर्मचारी जात आहेत. आमच्या पॅनेलला मतदान केले नाही तर उन्हाळ्यात पाणी मिळणार नाही, अशीही दमबाजी सुरु केली गेली आहे. पार्ट्या आणि जेवणावळींना तर उत आला आहे. शनिवारी सभासदांवर पैशाची खैरात होईल अशी चिन्हे आहेत. एकूणच बारामतीत सर्व सत्तास्थाने हाती असलेल्या राष्ट्रवादीला जगताप यांच्या बंडामुळे सोमेश्वरमध्ये पुरता घाम फुटला आहे.

