
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यापुढे मोठे आव्हान
●बारामती : विशेष प्रतिनिधी
राज्याचे लक्ष लागलेल्या श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूकीत कारखान्याचे विद्यमान अध्य़क्ष पुरुषोत्तम जगताप यांचे पारडे जड ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गेल्या चार दिवसांपासून कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तळ ठोकून प्रचार करत आहेत. परंतु त्यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणावर बेबनाव असल्याने त्याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलही रिंगणात आहे.
उमेदवार निवडीवरून नाराज होत पुरुषोत्तम जगताप यांनी अखेरच्या क्षणी बंडाचे निशाण फडकावले. पुरंदर भाजप व पुरंदर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोबत घेत लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेलची स्थापना केली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर तालुक्यातील या पहिल्याच निवडणूकीत राष्ट्रवादीला बंडखोरीचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी (अप)कडून श्री. सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार पॅनेल निवडणूक मैदानात आहे. तर जगताप यांनी पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांना सोबत घेत लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेलद्वारे जोरदार टक्कर दिली आहे. युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेलही निवडणूक रिंगणात आहे.
दरम्यान जगताप यांचे बंड राष्ट्रवादीला रोखता आले नाही. आता निवडणूकीच्या मैदानातही जगताप वरचढ ठरताना दिसत आहेत. अजितदादा यांच्या नंतर पक्षात सुंदोपसुंदी सुरु आहे. उमेदवारीवरून काही गटात तीव्र नाराजी आहे. शिवाय राष्ट्रवादीचे पदाधिकारी एकमेकांचे पाय ओढण्यात मग्न आहेत. त्याचा मोठा फटका उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील पॅनेलला बसण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादीत कोणाचा कोणाला मेळ राहिलेला नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, त्यांचे पुत्र खा. पार्थ व जय पवार गावोगावी फिरत आहेत. सभांद्वारे सभासदांशी संपर्क साधत आहेत. परंतु जगताप यांची प्रचार यंत्रणा त्यांच्या कित्येक पट पुढे गेली आहे. जगताप यांनी गेली १३ वर्षे कारखान्याचे चेअरमन पद सांभाळले. गेली ३५ वर्षे ते संचालक आहेत. त्यामुळे बारामती, पुरंदर, फलटण व खंडाळा या चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या सोमेश्वरच्या निवडणूकीची, सभासदांची त्यांना खडानखडा माहिती आहे. त्या जोरावर सध्या ते प्रचारात आघाडीवर आहेत. राष्ट्रवादीने नगरपरिषद, जिल्हा परिषद-पंचायत समिती, माळेगाव कारखाना, दूध संघ, खरेदी-विक्री संघ, बाजार समिती अशा सर्व ठिकाणच्या सदस्यांना, संचालकांना कामाला लावले आहे. पक्ष निरीक्षक नेमून जबाबदारी दिली आहे. परंतु राष्ट्रवादीच्या प्रचारात एकवाक्यता नाही. सुसंवादाचा अभाव जाणवतो आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. अजून एक दिवस बाकी आहे, या कालावधीत पक्षाने योग्य त्या दुरुस्त्या केल्या नाहीत तर मोठा फटका सहन करावा लागेल. सोमेश्वरच्या निकालाचा पुढे बारामती सहकारी बॅंक व पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणूकीतही पडसाद उमटतील अशी चिन्हे आहेत.
उपमुख्यमंत्री ठाण मांडून पण पदाधिकारी सुस्त
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमेश्वरसाठी गेल्या चार दिवसंपासून ठाण मांडून आहेत. गावोगावी त्या प्रचारसभा घेत आहेत. पार्थ व जय पवार यांच्याकडून प्रचाराचा झंझावात सुरु आहे. पण राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंग झटकून काम करताना दिसत नाहीत. अजितदादानंतर अनेकांनी स्वतःचा स्वार्थ साधून घेण्याचे, खिसे भरून घेण्याचे काम सुरु केले आहे.


