
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सहकारी क्षेत्रात सध्या ‘खुर्चीचा मोह’ हा मुद्दा चांगलाच गाजू लागला आहे. दूध संघ तसेच सोमेश्वर साखर कारखान्यातील पदाधिकाऱ्यांची मुदत संपूनही त्यांनी अद्याप राजीनामे न दिल्याने सभासदांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सध्या तालुकाभर या विषयावर चर्चांना ऊत आला आहे.
सहकारी संस्थांकडून मिळणाऱ्या वाहन, भत्ते आणि इतर सोयी-सुविधांमुळे काही पदाधिकारी पद सोडण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यामुळे चांगल्या प्रकारे चालणाऱ्या संस्थांमध्ये राजकारण शिरकाव करत असल्याचे चित्र दिसत आहे. याचा परिणाम भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतर राजकीय पक्षांनी या परिस्थितीचा फायदा घेतला, तर त्यात नवल वाटण्यासारखे काही राहणार नाही.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सहकारी संस्थांना आर्थिक बळ देतानाच त्यांच्यावर शिस्तही ठेवली होती. मात्र त्यांच्या पश्चात काही पदाधिकाऱ्यांकडून पक्षाची प्रतिमा डळमळीत करणारे वर्तन होत असल्याची टीका होत आहे. त्यांनी घालून दिलेले नियम पायदळी तुडवले जात असल्याने “पक्ष संघटनेत कोणीच कोणाचं ऐकत नाही का?” असा सवाल बारामतीकरांकडून उपस्थित केला जात आहे.
जिरायती भागातील कार्यकर्त्यांना संधी दिल्यास पक्षाला बळकटी मिळू शकते, मात्र संस्थांना अडचणीत आणणाऱ्या आणि पक्षाला वारंवार संकटात ढकलणाऱ्या पदाधिकाऱ्यांना वेळीच बाजूला करणे आवश्यक आहे.
दरम्यान, सोमेश्वर कारखान्याची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना पदाधिकाऱ्यांनी आपले वर्तन बदलणे गरजेचे आहे. नीतिमत्ता जपून ठरलेल्या वेळेत राजीनामे देणे हीच खरी सहकार संस्कृती असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.





